बेळगाव : मारीहाळ पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; 6 जण ताब्यात, ₹23,800 रोख जप्त
बेळगाव शहरातील मारीहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतले असून ₹23,800 रोख रक्कम, पत्त्यांचा संच आणि ताडपत्री जप्त केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै 2026 रोजी नागेश भरमशेट्टी यांच्या फार्महाऊसजवळ सार्वजनिक ठिकाणी काही जण पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पीएसआय मंजुनाथ हुलकुंद आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.
छाप्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले, तर आणखी काही संशयित घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून ₹23,800 रोख, पत्त्यांचा संच आणि जुगारासाठी वापरलेले साहित्य जप्त केले.
या प्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस अधिनियम, 1963 च्या कलम 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. छाप्याची कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

